चाळीसगाव प्रतिनिधी:

लग्नाच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यासाठी चालत आलेल्या पारंपारिक पद्धतींना फाटा देत मण्यार समाजाने सर्व सोपस्कार एकाच दिवशी पार पाडत समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव येथील सै.हमीद सै.रहीम मण्यार यांची मुलगी अरशीन बानो हिला पाहण्यासाठी शिरसोली येथील हाजी शेख इब्राहीम शेख बिस्मिल्ला मण्यार यांचा मुलगा शेख ईफ्तेकार व काही मोजके नातेवाईक चाळीसगाव येथे मुलगी पाहण्यासाठी आले होते.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दोन्ही परिवारातील प्रमुख मंडळींनी लागलीच उपवर मुलगी व मुलाला एकमेकांविषयी काय मत आहे याबद्दल जाणून घेतले असता दोघांनीही विवाहास संमती दर्शवल्याने परिवारातील प्रमुख सदस्यांनी कोणताही विलंब न करता मौलाना हाफीज शेख जावीद इशाली यांना बोलावून घेतले.मौलाना यांनी तत्काळ दोन्ही परिवारातील सदस्य व वधुवरांच्या संमतीने साखरपुडा तसेच लग्न लावून विवाहाचे सर्व विधी अत्यंत साध्या पद्धतीने व एकाच वेळी आटोपले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व वधु वरांकडील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत एकाच दिवसात मुलगी पाहणे, साखरपुडा व लग्न इत्यादी सर्व विधी संपन्न झाल्याने सगळीकडे या अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या लग्नाचीच चर्चा सुरू होती.आज सर्व विधी आटोपले परंतु नवरी मुलीला परिक्षा देण्यासाठी अजून चार ते पाच दिवस थांबावे लागणार असल्याने विदाई मात्र येत्या चार ते पाच दिवसांनी होणार आहे.यावेळी प्रमुख साक्षीदार म्हणून हाजी अ.कय्युम ,साकळी,शेख मुसलीम,जळगाव,रशीद सुपडू मण्यार हे होते.
याप्रसंगी इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुक शेख अमीर यांच्यासह अख्तर शेख जाफर मुंबई,रईस भाई कजगाव, रफीक शेख सर चाळीसगाव, शेख हुसेन भुसावळ, शेख मुनाफ चाळीसगाव, हाजी शेख करीम शिरसोली,सै.रमजान यांच्यासह मण्यार समाजातील प्रमुख मोजके मान्यवर उपस्थित होते.या अत्यंत साध्या पद्धतीने व एकाच दिवसात पार पडलेल्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असुन मण्यार समाजाचे (बिरादरी चे) सर्वत्र कौतुक होत आहे.


