भुसावळात इंधन दरवाढी विरोधात संविधान आर्मीचे सायकल तिरंगा मार्च ; रस्ता रोको व बैलगाडी ढकलून निषेध !


भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतकरी समर्थनासाठी तसेच पेट्रोल , डिझेल दरवाढ केंद्र सरकारने रद्द करावी या मागणीसाठी येथील संविधान आर्मी तर्फे शहरातील नाहाटा चौफुली वर सायकल तिरंगा मार्च व बैलगाडी सह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महेंगा तेल ” केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे. कारण या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे ,म्हणून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी संविधान आर्मीचे चीफ आंदोलन प्रमुख जगन सोनवणे आणि विविध 10 संघटनांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले . या
अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दिनांक 6 फेब्रुवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावात्मक नियोजनात शहरातील प्रमुख रस्त्याने बाजार पेठे मधून सायकल तिरंगा मार्च काढून केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला . डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सायकलीवर प्रवास करण्याची वेळ मोदी सरकारने सर्वसामान्यांवर आणली असल्याचे सांगून “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहंगा तेल”, “पेट्रोल डिझेलची शंभरी, मोदी साहेबांना मॅन ऑफ द मॅच करी” अशा घोषणा संविधान आर्मीतर्फे देण्यात आल्या. तसेच शेतकरी समर्थनासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारने रद्द करावी या मागणीसाठी सायकल तिरंगा मार्च व बैलगाडी सह रस्ता रोखो आंदोलन करून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि मंगेश गोटला यांना निवेदन देतांना सतत होणारी इंधन दरवाढ मध्यमवर्गीय आणि नोकरदारांचा आर्थिक कणा मोडणारी आहे,अशी भावना संविधान आर्मीचे चीफ जगन सोनवणे यांनी व्यक्त केली.चक्काजाम आंदोलनामुळे वाहनांची रांग लागल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
नाहाटा चौफुलीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *