भुसावळातील यावल रस्ता कामाला प्रारंभ ; आमदारांचा पाठपुरावा


भुसावळ (प्रतिनिधी )-
गेल्या वर्षभरापासून उपेक्षित असलेल्या यावल रस्त्याच्या कामाला ठेकेदाराला मुहूर्त गवसला असून सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रस्ता कामाचा शुभारंभ झाल्याने शहरवासीयांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दोन हजार 300 मीटर अंतराच्या रस्त्याचे काम गत अर्थसंकल्पात मंजूर झाले होते शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी या रस्ता कामाची निविदा काढूनही तांत्रिक अडचणींमुळे काम न झाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया बोलावल्यानंतर त्याच ठेकेदाराला काम मिळाले मात्र वर्षभरानंतरही ठेकेदाराकडून काम होत नसल्याने आमदारांनी या संदर्भात आवाज उठवताच रस्ता कामाला सोमवारी प्रारंभ करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम गत अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले होते शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामात तापी नदी पुलावर कारपेट टाकणे, स्मशानभूमीजवळील कामासह यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश होता. कंत्राटदार वाय.एम.महाजन यांनी सुरूवातीला हे काम घेतले होते मात्र तांत्रिक अडचणींमुळे कामाला सुरूवात न झाल्याने पुन्हा रीटेंडरींग करण्यात आल्यानंतर महाजन यांनाच काम मिळाले मात्र सुमारे वर्ष उलटूनही त्यांनी कामाल सुरूवात केलीच नाही.
यावल रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरीकांसह वाहनधारकांमधून लोक्रतिनिधींविषयी तीव्र संतापाची भावना व्यक्त होत होती. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत आमदार संजय सावकारे यांनी ठेकेदार मंजूर रस्त्याचे काम करीत नसल्याचा मुद्दा मांडला होता शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गत आठ दिवसांपूर्वी आमदारांनी बैठक बोलावून ठेकेदार काम करीत नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्यानंतर ठेकेदाराने रस्ता काम करण्यास सहमती दर्शवली.
खड्डेमय रस्त्यांना वैतागलेल्या भुसावळकरांसह वाहनधारकांना रस्त्याचे काम होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धत्तीने होण्याची या निमित्ताने अपेक्षा व्यक्त होत आहे. हजारो वाहनांची या रस्त्यांवरून वर्दळ असल्याने त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यात तेल घालून रस्ता कामाची पाहणी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका हद्दीच्या वादात यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर खड्डे बुजवण्यात आले नसल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त करण्यात येत होता मात्र हा भाग वर्दळीचा असल्याने रात्रीच्या वेळी वाहतूक कमी झाल्यानंतर या भागातही काम करण्यात येणार असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. ठेकेदाराला दर्जेदार कामाच्या सूचना केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *