सावदा –
येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे राहत्या घरात वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली असून, गाव परिसरात घबराट पसरली होती. मात्र वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सुत्रे फिरवित अवघ्या बारा तासात आरोपी परेश खुशाल भारंबे वय ३५ रा. रोझोदा यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
डोक्यावर खुप कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी चोरी करतांना ही घटना घडल्याचे आरोपीने कबुल केले .दरम्यान आरोपी परेश भारंबेला शुक्रवार रोजी रावेर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, रोझोदा येथे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, ओंकार पांडुरंग भारंबे वय वर्षे ९० व त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे वय वर्षे ८५ हे वृध्द दांम्पत्य राहात होते. त्यांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पासून कंटेनमेट झोन जाहीर करण्यात आले होते. नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर सहकारी येऊन तेथील नागरिकांना तपासणी करीत असत. या अनुषंगाने गुरुवार रोजी सकाळी डॉ. हारून काझी तपासणी साठी आले असता, डॉक्टरांना भारंबे यांच्या घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा डॉक्टरांनीच दरवाजा उघडला असता, घरात वृध्द पतीपत्नी रक्ताचे थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. त्यांनी पोलीस पाटलांनी माहिती दिली यावरुन त्वरीत पोलीस पाटलांनी सावदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व तपास चक्रे फिरू लागली .
ए पी आय राहुल वाघ यांनी लागलीच सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणले असता श्वानाने शेजारच्या गुरांच्या वाड्यातून फिरून, घराचे गच्चीवरून परत खाली उतरून संशयीत आरोपी परेश भारंबेच्या घराचा मार्ग दाखविला तेव्हा परेश हा शेतावर गेला होता. पोलिसांनी परेशला शेतातून ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी परेशने सर्व घटना सांगून खून केल्याचे कबूल केले .
कर्ज फेडण्याकरीता चोरी करून केली हत्या ;
परेशवर कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केली व दोघांची हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी हा वृध्द दांपत्याच्या घरा शेजारीच राहत होता. परेश हा मयत दाम्पत्यांचा सख्खा चुलत नातु असून तो नेहमी त्यांच्या घरातील कामेही करायचा. भारंबे आजोबा आजी जवळ भरपूर रोख पैसा असून तो पैसा ठेवलेली जागा त्याला माहित होती. म्हणून बुधवारी मध्यरात्री त्यांने वृद्धाचे घरात प्रवेश केला. माहित असलेल्या कपाटातून नोटांची काही बंडले घेतली व ती बंडले घेऊन घरा बाहेर निघतांना अचानक या म्हातार्यांना जाग आली. यामुळे घाबरलेल्या परेशने त्यांनी आरडाओरड टाळण्याकरीता जवळच्या सुऱ्याने त्यांचेवर वार केलेत.या मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोपीने पोलीसां जवळ सांगून खून केल्याचे कबूल केले आहे.
या तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक गायत्री नवटके ,आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम, हे रोझोदा येथे ठाण मांडून होते. श्वानपथकाच्या मदतीने थेट परेशच्या घराचा माग काढल्याने तपासाची दिशा मिळाली व त्यानंतर परेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दीली तसेच त्याचे रक्ताने भरलेले कपडे कुटटीच्या ढिगाऱ्यातून काढून दिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले .आरोपी परेश भारंबेला शुक्रवार रोजी रावेर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.



