भुसावळ (प्रतिनिधी) – आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले भाविक भक्त आषाढी एकादशीची वाट पहात असतात. ‘याची देही याची डोळा’ अशा या आनंदाच्या सुख सोहळ्याला यंदा मात्र दुरावले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाययोजना म्हणून सर्वत्र मंदिरे बंद आहेत. म्हणून आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी भुसावळकरांनी श्रीविठ्ठलाचे दर्शन घरीच घेण्याचे ठरवले आहे. कोरोनामुळे भुसावळ शहर व परिसरातील श्रीविठ्ठल मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये होणारे दिंडी, भजन, कीर्तन सोहळ्याचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. १६९ वर्षात पहिल्यांदा आषाढीला मंदिर बंद ठेवण्यात येणार असून विधीवत पूजाविधी मात्र होईल.
आषाढीनिमित्त श्रीविठ्ठल मंदिराची रंगरंगोटी करण्यात येऊन मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. मात्र यंदा हा सर्व दैदीप्यमान सोहळा भाविक बघू शकणार नसल्याने सर्व वारकरी व भाविकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील सुमारे १६९ वर्षापूर्वीचे अतिशय प्राचीन असे श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. सुमारे १८५१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली असल्याची आख्यायिका येथील वयोवृद्ध सांगतात. या प्राचीन अशा दुमजली विठ्ठल मंदिराचे मागील बाजूस नवीन बांधकाम होऊन मंदिराचे सभागृह व इमारत ही लग्न समारंभ, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यासह विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. वैकुंठवासी ह.भ.प धनजी बुवा महाराज, तोताराम महाराज, झेंडुजी महाराज, जगन्नाथ महाराज यांची अखंड सेवा व परंपरा या विठ्ठल मंदिरास लाभलेली आहे.
दि. १ जुलै २०२० रोजी पहाटे श्रीविठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तीस विधिवत महाअभिषेक व महापूजा पुजारी जनार्दन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तीला रेशमी महावस्त्र परिधान करण्यात येऊन सोन्याचांदीचे दागदागिने व आभूषणांनी साजशृंगार करण्यात येतो. मंदिराचे परिसरात श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हार, फुले, नारळ, अबीर, गुलाल, बुक्का व पूजेचे साहित्य यांचे विविध दुकाने थाटली जातात. मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र यंदा सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. प्रतिवर्षी या मंदिरात विठूमाउलीची भक्तिमय वातावरणात टाळ मृदूंगाच्या गजरात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हा दिंडी सोहळा सुद्धा रद्द करण्यात आला आहे.



