नवी मुंबई :
लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर भीक मागणाऱ्या बेघर, गरजूंची व्यवस्था पालिकेच्या निवारा केंद्रात करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख (सिवूडस), परिवहन समिती सदस्य समीर अमीन बागवान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
डी मार्ट व सीवूडचा राजा चौकात भीक मागणाऱ्या बेघर, गरजू मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉक डाऊन सुरू झाले तेव्हा स्थानिकानी त्यांना काही न काही देऊन मदत केली होती. अजूनही सामाजिक बांधीलकीतून मदत केली जातेच. मात्र हे गरजू नागरिकांच्या हाताला स्पर्श करून मदतीसाठी आर्जव करू लागली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरू शकते. या गोष्टीकडे शिवसेना विभाग प्रमुख समीर बागवान यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेने अशा गरजूंची सोय निवारा केंद्रात करून त्यांच्या स्वच्छतेचीही जबाबदारी घेतली आहे, ही गोष्ट देखील निदर्शनास आणून देत नवी मुंबई महापालिका हद्दीतील रस्त्यावर राहणाऱ्या बेघर, गरजूंची व्यवस्था निवारा केंद्रात करण्याबाबत निवेदन दिले आहे.



