भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई
करीत कोरोना आजारावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा करणार्या भुसावळातील युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या उपचारात रोग प्रतिकारक शक्ती हा महत्वाचा घटक आहे. मालेगाव येथील काढा कोरोनाच्या काळात उपयुक्त व गुणकारी ठरल्याने प्रसिध्द झालेला आहे. या अनुषंगाने भुसावळातील भाजपचे गटनेते हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांनी डाॅ.रफीक अहमद व डाॅ.जाकीर पिंजारी यांच्या मदतीने भुसावळातही या काढ्याची निर्मिती सुरू केली होती. यात नऊ युनानी घटकांचा समावेश असून यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मुन्ना तेली यांनी आपण ना नफा-ना तोटा या तत्वावर हे उत्पादन उपलब्ध करून देत असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. महाराष्ट्रासह एमपी व गुजरातमध्ये याची लोकप्रियता वाढीस लागली होती. या पार्श्वभूमिवर शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हा काढा तयार करणार्या युनिटवर धुळे येथील निरिक्षक तथा जळगावचे प्रभारी सहाय्यक आयुक्त शाम नारायण साळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक ए.एम.माणिकराव,अन्न सुरक्षा अधिकारी श्री.साळूंके यांच्या पथकाने
छापा टाकून काढा व काढ़ा बनवणारी सामग्री असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आठ दिवसांपूर्वी या काढ्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असल्याने येथे कारवाई करण्यात आल्याची माहिती साळे यांनी दिली.
या कारवाई बाबत मुन्ना तेली यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,काढा विकून पैसा कमवायचा उद्देश नव्हता फक्त सेवा होती.उच्च क्वालिटीचे औषध यात वापरले आहे.जीएसटी अधिकृत असून लायसन्सही आहे.आयुर्वेदीक व युनानी साठी लायसन्सची कुठलीही गरज नसते,अन्न व औषध प्रशासनाला उत्तर दिले जाईल.
*मुद्देमाल जप्त *
भुसावळ शहरातील कॉलनीतील एमआय शाळेच्या खोलीत जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने धाड टाकून धडक कारवाई करत 1 लाख 2 हजाराची कोरोना काढ्याची 34 खोके आणि 85000 हजार रुपये किमतीची दोन मशीन असा एकूण मुद्देमाल जप्त केल्याने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.
आठ दिवसांपूर्वी तक्रारदाराने या शाळेच्या आवारात अन्न व औषधी उत्पादनाचा परवाना नसताना कोरोना काढ्याची औषधी निर्मिती केली जात असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज जळगाव येथील पथकाने शाळेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास धाड टाकून चौकशी करून मुद्देमाल व मशिनरी जमा केलेली आहे. ही कारवाई अन्न व औषध सौंदर्यप्रसाधने कायदा कलम 18 अंतर्गत करण्यात आलेली आहे. या शाळेचे मालक आसिफ इसाक तेली यांना नोटीस बजावण्यात आलेली असून सात दिवसाचे आत आवश्यक त्या कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत,असा यावेळी पंचनामा करण्यात आलेला आहे. ही कारवाई ए.एम. माणिकराव सहआयुक्त , श्याम साळे प्रभारी सहाय्यक आयुक्त जळगाव तसेच भुसावळ बाजारपेठचे काॕ.बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.



