जळगाव –
कोरोना कालावधीत सुद्धा शहरासह ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत कायम तेवत ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य अत्यंत श्रद्धाशील वृत्तीने करत आहेत. शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असून त्यांच्याकडूनच संपूर्ण समाजाला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते, असे प्रतिपादन कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच नथाबाई गवळे यांनी केले.
ग्रामपंचायत कंडारी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे आयोजित शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात सौ. गवळे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. प्रतिभा इंगळे, माजी ग्रा. पं. सदस्य डिगंबर सुर्वे, गोपाळ रिवाजकर, मुख्याध्यापक संतोष वानखेडे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानदानाच्या अलौकिक कार्याबद्दल मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, साधना सूर्यराव, विनोद जयकर, सविता निंभोरे, गणेश तांबे, ज्योती वाघ आणि डॉ. जगदीश पाटील यांना सरपंच नथाबाई गवळे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सोबतच सर्वांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असल्याने त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभल्याने मी कृतकृत्य झाल्याचे सरपंच नथाबाई गवळे यांनी सांगितले. बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी शिक्षकदिनाची माहिती सांगून शिक्षकांनी घेतलेला वसा समाज घडवण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो याविषयीची विविध उदाहरणे दिली. ज्योती वाघ यांनी शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान हा आम्ही केलेल्या कार्याची पावती असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गणेश तांबे यांनी तर आभार सविता निंभोरे यांनी मानले.



