जॅकवेलपासून १०० ते १५० मीटर अंतरावर नदीपात्रात पाणबुडी टाकून पर्यायी व्यवस्था वरणगाव (वार्ताहर) : तापी नदीची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने वरणगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या कठोरा जॅकवेलसमोर पाणी उपशाची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. नदीतील पाणीपातळी कमी झाल्यामुळे जॅकवेलजवळील पाण्याचा फुटबॉल उघडा पडला असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन वरणगाव नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करत जॅकवेलपासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर तापी नदीपात्रात पाणबुडी टाकून पर्यायी पाणी उपशाची व्यवस्था केली आहे. तापी नदीतील पाणीसाठा कमी होत असल्याने कठोरा जॅकवेलमधून पाणी उचलण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. ऐनवेळी पाणी उपसा बंद पडल्यास संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची भीती होती. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली. नदीपात्रातील प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाणबुडी टाकण्याचे काम हाती घेतले. अनेक तासांच्या परिश्रमानंतर जॅकवेलपासून दूर अंतरावर पर्यायी व्यवस्था उभारण्यात यश आले. यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुख्याधिकारी, नगराध्यक्षांचे विशेष लक्ष शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये तसेच पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी राहुल भोये आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिले. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी वेळीच पावले उचलण्यात आली आहेत. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक या कामात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील निलेश झांबरे, मुख्तार खान, वासुदेव भोई, शंकर जावळे, मयूर भंगाळे, जतिन सपकाळे, अमोल भोई, किरण जाधव, वाल्मिकी जाधव आणि प्रमोद कोळी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. नदीपात्रात उतरून प्रतिकूल परिस्थितीत अनेक तास मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक होत आहे. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी नगरपालिकेने केलेली ही पर्यायी व्यवस्था वरणगावकरांसाठी दिलासादायक ठरणार असून, आगामी काळात तापी नदीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.



