बियाणी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा ; विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये दाखवली चमक; शिस्तबद्ध संचलन ठरले आकर्षण ;

भुसावळ(प्रतिनिधी )- येथील बियाणी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवार, दि. २३ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या चारही हाऊसच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. त्यानंतर लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवात १०० मीटर व २०० मीटर धावणे, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक तसेच क्रिकेट आणि थाळीफेक अशा विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले.

याप्रसंगी डॉ.संगीता बियाणी,मनोज बियाणी,रजनी सावकारे,डॉ.तुषार पाटील,विजय फिरके आणि शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व पटवून दिले. रजनी सावकारे यांनी जीवनातील खेळाचे स्थान स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तर,डॉ.तुषार पाटील यांनी सुदृढ आरोग्यासाठी खेळ आणि सकस आहार किती आवश्यक आहे, तसेच खेळामुळे अंगी शिस्त व नियमबद्धता कशी बणवली जाते, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया यांनी केले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक रितेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत धावताना विद्यार्थिनी.