सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’; महात्मा गांधी उद्यानात रसिकांची मांदियाळी….दीपावलीच्या मंगलमय पहाटे शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने महात्मा गांधी उद्यानाचा परिसर स्वरमय झाला. आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान आणि कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने आयोजित रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शास्त्रीय संगीतापासून भक्तिगीतांपर्यंत स्वरांची मैफल

कार्यक्रमाची सुरुवात आशिष रानडे यांनी रामकली रागातील बंदिश आणि 'दीपावली सूरके संग...' या सादरीकरणाने केली. त्यानंतर आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी 'राधाधर मधुमिलिंद जय जय...' ही रचना सादर केली. रानडे यांनी 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातील 'तेजो निधी लोहगोल' हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर करत रसिकांची दाद मिळवली.

अहिर भैरव रागातील 'राम का गुणगान...' या गीताने मैफलीत विशेष रंग भरला. श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेल्या आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या या गीताचे सादरीकरण आशिष रानडे आणि ईश्वरी यांनी केले.