किल्ल्यातून शिवचरित्राचा जागर ! -पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी निवासस्थानी साकारली प्रतापगडाची आकर्षक प्रतिकृती ;

भुसावळ (उज्वला बागुल प्रतिनिधी)-: दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत किल्ले उभारण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जात आहे. या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. याच भावनेतून भुसावळ येथील पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी आपल्या निवासस्थानी स्वतःच्या कल्पकतेतून प्रतापगड किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे.

या प्रतिकृतीमध्ये प्रतापगडाची वैशिष्ट्यपूर्ण तटबंदी, बुरूज, प्रवेशमार्ग आणि किल्ल्यावरील मंदिराची रचना बारकाईने साकारण्यात आली आहे. तसेच किल्ल्याच्या परिसरात मावळे, शिवकालीन प्रसंग आणि तत्कालीन जीवनशैली दर्शविणाऱ्या छोट्या प्रतिकृतींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण किल्ल्याची प्रतिकृती जिवंत झाल्याचा भास निर्माण होतो.

केवळ मनोरंजन किंवा सजावट म्हणून किल्ले उभारण्याऐवजी त्यामागील इतिहास, शौर्य आणि स्वराज्याचा विचार समजून घेण्याचा संदेश या उपक्रमातून मिळतो. पोलीस उपअधीक्षकांसारख्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतानाही केदार बारबोले यांनी जोपासलेली ऐतिहासिक वारसा विषयी आवड आणि कलात्मकता विशेष कौतुकास्पद आहे.

त्यांनी साकारलेली प्रतापगडाची ही प्रतिकृती दिवाळीच्या निमित्ताने शिवचरित्राचा जागर करणारी असून, नव्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी अभिमान आणि जिज्ञासा निर्माण करणारी ठरत असल्याने या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे परिसरात  कौतुक होत आहे.