वसुबारसेच्या मुहूर्तावर मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन! गोसेवा केंद्राच्या पाच वर्षांच्या सेवाकार्याचे कौतुक; संगोपनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ;

भुसावळ (प्रतिनिधी) :गोमातेचे पूजन, मुक्या जीवांच्या रक्षणाचा संकल्प आणि गोसेवकांच्या कार्याचा गौरव अशा भक्तिमय वातावरणात भुसावळात वसुबारसचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 दीपावलीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसुबारसेनिमित्त राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गोमातेचे, गाई-वासरांचे व नंदीचे विधिवत पूजन करून वसुबारस पावन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गाई-वासरांना गोड नैवेद्य देऊन गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शहरातील गोसेवा केंद्राला पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, या केंद्राच्या माध्यमातून कत्तलीपासून वाचविलेल्या गाई, नंदी तसेच अपघातात जखमी झालेल्या अनेक मुक्या जीवांचे संगोपन व उपचार केले जात आहेत. केंद्रात अशा जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी दिले.

शहरातील श्री योगेश वासुदेव पाटील यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर उपलब्ध करून दिलेल्या जागेत असंख्य मुक्या जीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य सुरू असल्याबद्दल मंत्री सावकारे यांनी विशेष दखल घेतली. तसेच गोसेवक रोहित महाले व त्यांच्या मित्रपरिवाराचे त्यांनी कौतुक केले.

गोसेवा हे ईश्वरी कार्य!

गोरक्षणाचे कार्य म्हणजे देवकार्य आहे. गोमाता ही विश्वाची माता असून, तिचे रक्षण करण्यासाठी गोरक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने पुढे येतात. घरावर तुळशीपत्र ठेवून मुक्या जीवांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या गोसेवकांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मंत्री संजय सावकारे यांनी काढले. रोहित महाले यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास थेट संपर्क साधावा, असे सांगत त्यांनी गोसेवेचे कार्य असेच अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

१९ वर्षांचा संघर्षमय गोसेवेचा प्रवास!

यावेळी गोसेवक रोहित महाले यांनी आपल्या सेवाकार्याचा प्रवास कथन केला. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा अभियानाच्या माध्यमातून गुरुवर्य श्री मिलिंदजी एकबोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पावन कार्याची सुरुवात झाली. मागील १९ वर्षांपासून अत्यंत संघर्षमय परिस्थितीत, अनेकदा अनवाणी पायांनी प्रवास करीत गोसेवेचे कार्य सुरू ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रवासात श्री योगेश पाटील हे आमच्यासाठी देवदूत ठरले. आम्ही करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी कत्तलीपासून वाचविलेल्या गाई, नंदी तसेच अपघातग्रस्त जनावरांचे प्राण वाचविण्याचे कार्य केले जाते. मुक्या जीवांच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही घेतली जाते. 'मुका जीव वाचलाच पाहिजे' हे ब्रीदवाक्य हृदयाशी बाळगून गोसेवक अविरतपणे सेवा करीत आहेत, असे भावपूर्ण मनोगत रोहित महाले यांनी व्यक्त केले.

गोभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाभरातील गोसेवक, शहरातील बाळगोपाळ टीम तसेच परिसरातील गोभक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरसेवक श्री मुकेश गुंजाळ, श्री वरुण पाटील, श्री जीतू जाट, श्री कुणाल शिंदे, श्री महेंद्र पाटील, श्री यश पाटील, श्री दीपक फालक, श्री दामोदर राजपूत, श्री आदित्य धायडे, श्री वैभव वाघे, डॉक्टर श्री प्रदीप श्रीखंडे, श्री वीरेंद्र तुरकेले, श्री लोकेश वाणी यांच्यासह परिसरातील समस्त गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.