भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल बियाणी परिवारातील कन्या डॉ.मुस्कान मनोज बियाणी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी एम.डी. (डर्मेटोलॉजी) संपादन करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बियाणी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वागत व अभिनंदन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी बियाणी एज्यु. ग्रुपचे सर्व पदाधिकारी,मान्यवर, शिक्षकवृंद व उपस्थितांनी डॉ.मुस्कान बियाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांचे विशेष कौतुक करण्यात आले. डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करून त्यांनी बियाणी परिवारासह संपूर्ण शैक्षणिक संस्थेचा गौरव वाढविला आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ.मुस्कान यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत समाजसेवेच्या भावनेतून रुग्णसेवेचे व्रत जपण्याचा संदेश दिला.
डॉ. मुस्कान बियाणी यांचे हे यश म्हणजे केवळ एका व्यक्तीची शैक्षणिक उपलब्धी नसून, मेहनत, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी आदर्श आहे.या आनंददायी सोहळ्यामुळे बियाणी परिवारात तसेच संपूर्ण बियाणी शैक्षणिक समूहात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे,पाळधी येथील प्रतापराव गुलाबराव पाटील,जळगाव येथील उद्योगपती सुनील झवर,पाळधी येथील धनराज कासट,भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे,भुसावळ नगर परिषदेचे सर्व नगरसेवक,भुसावळ शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स,भुसावळ शहरातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सर्व संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - भुसावळ येथे डॉ.मुस्कान बियाणी यांच्या स्वागत सोहळा कार्यक्रमात उपस्थित संजय सावकारे सोबत डावीकडून प्रतापराव पाटील,मनोज बियाणी,सुनिधी सावकारे,रजनी सावकारे,डॉ.संगिता बियाणी आदी.