भुसावळ विभागाचे रेल्वे प्रवाशांना आवाहन – रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ सोबत नेऊ नका

भुसावळ (प्रतिनिधी) 

रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि संरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागाने सर्व रेल्वे प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नये. असे करणे केवळ रेल्वे अधिनियमांतर्गत कायदेशीर गुन्हा नसून, त्यामुळे स्वतःच्या तसेच अन्य सहप्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

रेल्वे अधिनियम, 1989 मधील कलम 164 अंतर्गत, सदर व्यक्ती रेल्वेगाडीत प्रतिबंधित ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ घेऊन प्रवास करताना आढळल्यास, तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. 

प्रवाशांमध्ये सुरक्षिततेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विभागीय रेल्वे प्रशासनामार्फत नियमितपणे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पोस्टर्स, बॅनर्स तसेच रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांच्या माध्यमातून प्रवाशांना पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, फटाके, रॉकेल आदी ज्वलनशील पदार्थ प्रवासादरम्यान सोबत न बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

याशिवाय, विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल (RPF) तसेच वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांना जागरूक केले जात आहे. रेल्वे प्रवासादरम्यान ज्वलनशील व धोकादायक पदार्थ सोबत न बाळगण्याबाबत त्यांना सुरक्षा नियमांची माहिती देण्यात येत आहे.

रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस तसेच वाणिज्य विभागातील तपासणी कर्मचाऱ्यांमार्फत रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये नियमितपणे देखरेख व तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या सामानाची आकस्मिक तपासणी देखील करण्यात येत आहे.

प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या निदर्शनास एखादा सहप्रवासी संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करत असल्याचे आढळल्यास, त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधून माहिती द्यावी.

प्रवाशांची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी सर्व प्रवाशांनी नियमांचे पालन करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.