भुसावळ(प्रतिनिधी )- दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना भुसावळचा बाजारपेठ सध्या पूर्णपणे फुलून गेली आहे. , जामनेर रोड,गांधी चौक, जळगाव रोड, रेल्वे बाजार, खडका रोड, सराफ बाजार, डी. एस. मार्केट , आठवडे बाजार, चुडी मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. आकाशकंदील, रंगबेरंगी रांगोळी, फराळ, सुगंधी उटणे, सुशोभिकरण साहित्य, पणती, नारळ, पूजेचे साहित्य, लक्ष्मी मूर्ती यासह फळ, फुल, फटाके आणि कपडा मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. *आकाशकंदील आणि सुशोभिकरणाला मोठी मागणी* यंदा पारंपारिक कागदी आकाशकंदीलांबरोबरच एलईडी लाईट असलेले, डिझायनर, फॅन्सी आकाशकंदील बाजारात आले आहेत. ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आकाशकंदील उपलब्ध आहेत. घर सजवण्यासाठी एलईडी माळा, तोरण, फुलांच्या माळा, रांगोळी स्टिकर, कृत्रिम फुलांना मोठी मागणी आहे. दुकानदारांनी दुकानांसमोरच आकर्षक सजावट केल्याने बाजारात दिवाळीचा फील येत आहे. *रांगोळी आणि सुगंधी उटण्याची चढाओढ* रांगोळीसाठी तयार रंग, डिझाईनचे साचे, ठिपक्यांची रांगोळी, रेडिमेड रांगोळी पॅच याला महिलांकडून विशेष पसंती मिळत आहे. तर अभ्यंगस्नानासाठी लागणारे सुगंधी उटणे, सुगंधी तेल, साबण यांची दुकानेही गजबजली आहेत. “यंदा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उटण्याला जास्त मागणी आहे,” असे एका विक्रेत्याने सांगितले. *फराळाचा सुगंध दरवळला* चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, कडबोळी, अनारसे यासह तयार फराळाच्या दुकानांवर मोठी गर्दी आहे. घरगुती बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या फराळाला विशेष मागणी आहे. अनेकांनी ऑर्डरवर फराळ देणे सुरू केले आहे. मिठाई दुकानांमध्येही काजू कतली, मोतीचूर लाडू, बर्फीसाठी रांगा लागत आहेत. *पणती, नारळ, पूजेचे साहित्य आणि लक्ष्मी मूर्ती* लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या मातीच्या पणत्या, रंगीत पणत्या, समई, नारळ, विड्याची पाने, फुले, हळद-कुंकू, अक्षता, कापूर, उदबत्ती यांची खरेदी सुरू आहे. लक्ष्मी, गणपती, कुबेराच्या सुबक मूर्तींनी बाजार सजला आहे. मातीच्या मूर्तींना पर्यावरणपूरक म्हणून अधिक पसंती मिळत आहे. *फळ, फुल आणि फटाक्यांचा बाजार तेजीत* फळ बाजारात सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री, द्राक्षे यांची आवक वाढली आहे. झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंतीच्या फुलांच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी खरेदी जोरात सुरू आहे. फटाक्यांच्या अधिकृत दुकानांवर मुलांसह पालकांची गर्दी आहे. फुलबाजी, भुईचक्र, अनार, लहान मुलांसाठीचे टिकल्या, पॉप-अप यांना अधिक मागणी आहे. प्रशासनानेही फटाके विक्रीवर लक्ष ठेवले आहे. *कपडा मार्केटमध्येही उत्साह* दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदीसाठी कपडा मार्केटमध्येही गर्दी आहे. साड्या, कुर्ता-पायजमा, मुलांचे कपडे, रेडिमेड कपड्यांवर आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. महिलांसाठी पैठणी, सिल्क साड्यांना विशेष मागणी आहे. दुष्काळाचे सावट व्यापाऱ्यांमध्ये नाराजी , नागरिकांमध्ये उत्साह “गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत व यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने यंदा बाजार थोडा मंदितच आहे. दिवाळीच्या आठवड्यात गर्दी वाढेल,” असे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर “महागाई असली तरी सण साजरा करायचाच, मुलांसाठी फटाके, आकाशकंदील घ्यायला आलो,” असे एका ग्राहकाने सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. सातपुडा कन्या न्यूज, भुसावळ


