जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा येथील प्रसिद्ध रथोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून जेरबंद केले आहे. गणेश कचरू पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ६ लाख ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे पारोळा येथे आयोजित रथोत्सवात २२ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत तीन ते चार अज्ञात इसमांनी नागरिकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. तपासादरम्यान मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीतील संशयित आरोपी हा बीड शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव गणेश कचरू पवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात तांत्रिक पुरावे संकलित केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक बीड शहरात दाखल झाले. सलग आठ दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर अखेर गणेश कचरू पवार याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने दोन पंच आणि सोनार यांच्या समक्ष जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत. या पथकाने केली कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे रथोत्सवातील चोरीच्या घटनेचा तपास पुढे सरकला असून, या गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


