प्रभाग क्रमांक २० मध्ये रविवारच्या बाजारामुळे नागरिक त्रस्त; नगरसेविका सीमा नरवाडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये रविवार रोजी  भरणाऱ्या बाजारामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत नगरसेविका सौ. सीमाताई नरवाडे यांनी पुढाकार घेत मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर केले.

प्रभागातील विविध गल्लीबोळांमध्ये रविवारच्या बाजारातील काही भाजीपाला विक्रेते दुकाने थाटत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरात ये-जा करणेही कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः एखाद्या घरात कोणी आजारी असल्यास, तसेच लग्नकार्य किंवा अंत्यविधीच्या प्रसंगी नातेवाईक व नागरिकांना संबंधित घरापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय भाजीपाला विक्रेते संध्याकाळी शिल्लक भाजीपाला रस्त्यावरच टाकून जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.

या समस्यांची दखल घेत नगरसेविका सीमा नरवाडे यांनी प्रभागातील अनेक नागरिकांच्या सह्या घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. रविवारच्या बाजारामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी प्रशांत नरवाडे सर, तनुज धांडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.