जळगाव (प्रतिनिधी )- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्यातर्फे बाल निरीक्षण गृहात *बालिका पूजनाचा* कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून बालिकांचा सन्मान, त्यांच्याप्रती आदरभाव आणि स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. याच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे औचित्य साधून बालिकांमध्ये देवीचे रूप पाहत त्यांचे पूजन करण्यात आले. बालिकांना सन्मानपूर्वक भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बालिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या मनीषा पाटील आणि ज्योती राणे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी बालिकांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. मुलींना शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर जीवनात प्रगती करण्याची संधी मिळाली पाहिजे, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने बालिकांचा सन्मान व सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव ही सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. महिला सक्षमीकरण, बालिकांचा सन्मान आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीच्या पूजनाला सामाजिक जाणिवेची जोड देणारा ठरला. बालिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमातून बालिकांचा सन्मान म्हणजेच स्त्रीशक्तीचा सन्मान हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. यावेळी बाल निरिक्षण गृहाचे अधिक्षक रविकिरण आहिरराव क्रीडा शिक्षक प्रविण पाटील वंदना मंडावरे नेहा जगताप राधिका पाटील शरयू पाटील,माया गाडे,वनिता चव्हाण सरला जयकर,आशा लोखंडे,नीता पवार, कमल पाटील, उपस्थित होते


