भुसावळात सेवा संकल्प अभियानांतर्गत ४९ ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप; सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन


भुसावळ तहसील कार्यालयाचा उपक्रम; आतापर्यंत ५०४ ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण

भुसावळ प्रतिनिधी : तहसील कार्यालय भुसावळच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना ४९ ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची होणारी सायबर फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत एकूण ५०४ ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जगताप यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी – तहसीलदार नीता लबडे
यावेळी भुसावळच्या तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनीही सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना ‘वृद्ध’ म्हणून संबोधण्याऐवजी ‘ज्येष्ठ’ आणि अनुभवाने समृद्ध व्यक्ती म्हणून सन्मान द्यावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी आणि दैनंदिन जीवनातील इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित
या कार्यक्रमाला वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. पी. जी. पाटील आणि सचिव श्री. सतीश जंगले उपस्थित होते. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांची सुरक्षितता आणि त्यांना शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.