भुसावळ (प्रतिनिधी )- शारदीय नवरात्रोत्सवाच्या अष्टमीनिमित्त रविवार, दि. 18 ऑक्टोबर 2026 रोजी ब्राह्मण संघ, भुसावळ येथे श्री महालक्ष्मी पूजनासह विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत श्री महालक्ष्मी पूजनाचा धार्मिक, सायंकाळी 7 वाजता श्री महालक्ष्मीची आरती आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने घागरी फुंकण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरण पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांच्या सहभागातून स्वयंस्फूर्त अभंग, भजन व गीत गायनाच्या कार्यक्रमात भक्तिगीतांच्या माध्यमातून देवीचा जागर होणार आहे. विविध धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत करण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे. ब्राह्मण संघात दरवर्षी धार्मिक परंपरेनुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदाही अष्टमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथेप्रमाणे रात्री 12 वाजता श्री महालक्ष्मीची आरती करून संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भुसावळ शहरातील सर्व भाविक, समाजबांधव आणि भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा व या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


