भुसावळ प्रतिनिधी : शहरातील आरपीएफ बॅरेकसमोर, दुर्गादेवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्मदा कॉलनी परिसरात आरपीएफच्या तुटलेल्या व जुन्या घरांमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरू असून, मृतदेहाबाबत अधिक तपास केला जात आहे. मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे नेमके कारण आणि हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतर या घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नर्मदा कॉलनी परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


