भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, त्याच्या निषेधार्थ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातींची एकता कायम ठेवण्यासाठी जिल्हाभरातील आंबेडकरी जनतेने लाखोंच्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केले. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने हा महामोर्चा दुपारी २ वाजता शिवतीर्थ मैदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून सुरू होणार आहे. त्यानंतर कोर्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे. अनुसूचित जातींच्या ५९ घटकांमध्ये उपवर्गीकरणामुळे फूट पडण्याची शक्यता असल्याचा दावा सोनवणे यांनी केला. घटनादत्त आरक्षणात कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण किंवा बदल करू नये, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. प्रमुख मागण्या महामोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या ५९ जातींच्या घटनादत्त आरक्षणात कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण किंवा बदल करू नये, आरक्षणाला आर्थिक निकष लावू नयेत आणि उपवर्गीकरणासाठी नेमण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल अमान्य करावा, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या ५९ जातींची स्वतंत्र जनगणना करावी, खासगी उद्योग व संस्थांमध्येही आरक्षण लागू करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच अनुसूचित जातींच्या ५९ जातींचा शासकीय नोकऱ्यांमधील अनुशेष (बॅकलॉग) तात्काळ भरावा, या मागण्याही करण्यात येणार आहेत. प्रमुख नेत्यांची उपस्थिती महामोर्चाला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप, भीमशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे तसेच ऑल इंडिया पँथर्स सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह विविध प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे जिल्हा नेते दिनेश इखारे, रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवदत्त मकासरे, गणेश जाधव, विक्रांत नरवाडे, सचिन बाऱ्हे, सागर गाढे, रिपब्लिकन सेना भुसावळ शहराध्यक्ष लीलाधर सपकाळे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


