आ. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी? चौकशीची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) -माजी मंत्री तथा विद्यमान आ. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आ. खडसेंच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी झाल्याचा संशय आहे. याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनीच संशय व्यक्त करत पोलिसात धाव घेतली आहे. या संदर्भात आ. खडसे यांनी या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील आपला कॉल रेकॉर्ड होत असल्याचा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला होता.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळ मलकापूर रोडवर आ.एकनाथ खडसे यांचे ‘खडसे फार्म’ या नावाने फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवून रेकी व चित्रीकरण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. 28 सप्टेंबर 2026 रोजी हा प्रकार घडला आहे.
ही घटना घडली त्यावेळी आ. एकनाथराव खडसे हे मुंबई येथे होते. मात्र, त्यांच्या फार्महाऊसवर सुरक्षेसाठी असलेल्या वॉचमनच्या निदर्शनास रात्रीच्या वेळी संशयास्पद पद्धतीने ड्रोन उडताना आले. त्याने तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ड्रोनच्या हालचालींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले. त्यामुळे या घटनेचा तपास करताना हे चित्रीकरण महत्त्वाचा पुरावा ठरू शकते, असे खडसे यांनी पोलिसांना कळविले आहे.



रात्रीच्या वेळी कोणतीही परवानगी नसताना फार्महाऊसच्या परिसरात ड्रोन उडविणे आणि त्याद्वारे रेकी किंवा चित्रीकरण करणे ही बाब संशयास्पद असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. या प्रकाराची आमदार तथा विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

परवानगीशिवाय मोबाईल टॅप
दरम्यान, यापूर्वीही आपल्या परवानगीशिवाय मोबाईल फोन 62 दिवस बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तथापि, या शंकेची वस्तुनिष्ठ पडताळणी तपासातूनच होणे अपेक्षित आहे.