भुसावळ (प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी पूर्ण क्षमतेने म्हणजेच २१४.०० मीटर झाली असून धरणात कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने कायम ठेवण्यासाठी वक्र दरवाजे तसेच कालव्याद्वारे सुरू असलेला अतिरिक्त पुराच्या पाण्याचा विसर्ग दुपारी ३ वाजता बंद करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार हतनूर धरणाची सद्य पाणीपातळी २१४.०० मीटर असून ती धरणाच्या पूर्ण जलाशय पातळीइतकीच आहे. धरणाचा एकूण जलसाठा ३८८.०० दशलक्ष घनमीटर ), तर उपयुक्त जलसाठा २५५.०० दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणातून रेडियल गेटद्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही, तसेच रेडियल गेट बंद आहेत. कालव्याद्वारेही पाण्याचा विसर्ग शून्य आहे. आर.एस. गेटमधूनही विसर्ग सुरू नाही. आजचा पाऊस शून्य मिमी असून हतनूर प्रकल्प परिसरातील एकूण पर्जन्यमान ४७३ मिमी नोंदविण्यात आले आहे. धरणाची पाणीपातळी २१४.०० मीटर झाल्यानंतरही जलसाठ्यात पाण्याची आवक सुरू राहिल्यास पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार धरणातून तापी नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संबंधितांकडून वेळोवेळी देण्यात येईल. तापी नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


