भुसावळात नारखेडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व ‘पालवी’ प्रकाशन समारोह उत्साहात ;

राज्यभरातून ४४० विद्यार्थी व १०९ नवसाहित्यिकांचा सहभाग; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा
भुसावळ (प्रतिनिधी)
भुसावळ, दि. २१ सप्टेंबर २०२६ : स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा, तसेच शिक्षकांसाठी कथा व काव्यलेखन स्पर्धा आणि नवसाहित्यिकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह व कादंबरी राज्य पुरस्कारांचा ‘पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह’ भुसावळ येथील प्रभाकर हॉलमध्ये उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

राज्यस्तरीय या स्पर्धांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धांमध्ये तब्बल ४४० विद्यार्थी स्पर्धक, तर साहित्य पुरस्कारांसाठी १०९ नवसाहित्यिकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲड. श्रीमती एस. ए. अडकमोल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व आयोजनाची माहिती दिली. यानंतर मान्यवरांचा परिचय व सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यालयाच्या ‘पालवी’ या वार्षिक नियतकालिकाच्या ‘ज्ञानकर्मी स्व. दादासाहेब एन. के. नारखेडे जन्मशताब्दी वर्ष विशेषांका’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. व्ही. टी. भंगाळे यांनी संकलित केलेल्या ‘शिक्षणतज्ञ व उद्योग महर्षी स्व. दादासाहेब एन. के. नारखेडे : एक प्रेरणादायी प्रवास’ या जीवनपटाचेही प्रकाशन करण्यात आले.

विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव
विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी विजेत्या स्पर्धकांनी नमुना वक्तृत्व तसेच सुगम संगीताचे सादरीकरण केले.

प्रमुख अतिथी प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल शाळा व संस्थेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता अधिकाधिक विकसित करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा साधन म्हणून सुयोग्य वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

नवसाहित्यिकांनी इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करत अधिकाधिक दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य माणसाला संवेदनशील बनवते आणि सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

साहित्य पुरस्कारांचे मानकरी
यावेळी स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सौ. शिल्पा प्रवीण ढोमणे — ‘रेवडी’ कथासंग्रह
सौ. निशा पराग काळे — ‘तुझा कस्तुरी स्पर्श’ कवितासंग्रह
सौ. अंजली अरुण पांडे — ‘कहाणी जिद्दीची’ कादंबरी
या तिन्ही साहित्यकृतींच्या लेखिकांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

आयोजनातील मान्यवरांचा सन्मान
विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांचे प्रमुख श्री. मनोज तडवी, शिक्षक व नवसाहित्यिकांसाठी आयोजित स्पर्धा तसेच राज्य पुरस्कारांचे प्रमुख श्री. नितीन पाटील आणि वार्षिक नियतकालिक ‘पालवी’चे संपादक श्री. मनोज कुळकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून मेहनतीतील सातत्य आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हे यशाचे महत्त्वाचे गमक असल्याचे सांगितले.

संस्था पदाधिकारी व शिक्षकांची उपस्थिती
कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी श्री. पी. व्ही. पाटील, ऑनरेरी जॉइंट सेक्रेटरी श्री. प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य श्री. विकास पाचपांडे, श्री. भाग्येश मकरंद नारखेडे, संस्था सदस्या सौ. अर्चनाताई मकरंद नारखेडे, सौ. शैलजाताई रमाकांत फालक, सौ. श्वेता भाग्येश नारखेडे, संस्था सदस्य श्री. पी. ई. नेमाडे, प्रभाकर हॉलचे मालक श्री. चेतन पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲड. श्रीमती एस. ए. अडकमोल, उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. पाठक, संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एल. राणे, श्री. बी. बी. जोगी यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राज्यभरातून आलेले स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर एन. नारखेडे, चेअरमन श्री. श्रीनिवास एन. नारखेडे, सदस्य डॉ. संजीव एन. नारखेडे, श्री. राज किशोर नारखेडे तसेच इतर संस्था सदस्यांनी भ्रमणध्वनीद्वारे कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश दिले.

विविध मान्यवरांनी सांभाळली जबाबदारी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन राणे यांनी केले. श्री. मनोज तडवी यांनी अहवाल वाचन केले. अतिथी परिचय सौ. शुभांगी पाटील, तर अध्यक्ष परिचय श्रीमती रिता महाजन यांनी करून दिला. पारितोषिक विजेत्या स्पर्धकांच्या यादीचे वाचन श्री. सुहास चौधरी व सौ. वर्षा कुरकुरे यांनी केले. राज्य पुरस्कारांची उद्घोषणा श्री. नितीन पाटील यांनी केली. श्री. एस. पी. पाठक यांनी आभार मानले.

अखेर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.