मांडवा दिगर व वाडी किल्ला येथे रक्षा सूत्र बांधून ‘तू मैं एक रक्त’ भावनेचा संदेश; वृक्षवाटप व वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प भुसावळ (प्रतिनिधी )-: रक्षाबंधनाच्या माध्यमातून स्नेहबंध दृढ करण्यासोबतच वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला समितीच्या माध्यमातून मांडवा दिगर व वाडी किल्ला येथील जनजाती बांधवांसोबत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महिला, पुरुष तसेच लहान मुलांना रक्षा सूत्र बांधून बंधुभाव, आपलेपणा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून ‘तू मैं एक रक्त’ ही भावना व्यक्त करत समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर स्नेह, बंधुभाव आणि एकात्मतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनजाती वस्तीवरील बांधवांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. जनजाती बांधवांचे पर्यावरणाशी असलेले जवळचे नाते लक्षात घेऊन यावेळी वृक्षवाटप तसेच वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देत परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या जिल्हा महिला प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी, जिल्हा सहकोषाध्यक्ष ॲड. जयश्रीताई देशमुख तसेच तालुका महिला प्रमुख पत्रकार उज्वला बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले. वस्तीवरील जनजाती बांधवांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.


