नशिराबाद ( प्रतिनिधी ): “आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे कोणालातरी दृष्टी देऊ शकतात, आपले हृदय कोणाच्यातरी शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ दान नसून, विझणाऱ्या आयुष्याला दिलेले जीवनदान आहे,” असा भावनिक आणि प्रबोधनात्मक संदेश देत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबादच्या वतीने गावात भव्य अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. जागतिक अवयवदान दिन तसेच राज्य शासनाच्या ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणांनी दुमदुमले नशिराबाद नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी हातात माहितीपत्रके, आकर्षक पोस्टर्स घेऊन ‘अवयवदान-श्रेष्ठ दान’, ‘चला अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया’ अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी असलेल्या गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान रॅलीच्या सांगता सभेत डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती दिली. ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. देशात अनेक रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याने ग्रामीण भागातूनही अवयवदानाच्या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते रॅलीच्या व्यवस्थेपर्यंत विशेष परिश्रम घेतले. रॅलीचे शिस्तबद्ध संचलन आरोग्य सेवक दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन आणि वासुदेव पाटील यांनी केले. तांत्रिक बाजू प्रयोगशाळा तंत्रज्ञ नीलिमा येलगिरे व विजय सपकाळे यांनी सांभाळली. रॅलीदरम्यान व्यवस्था राखण्यासाठी १०२ रुग्णवाहिका चालक राजाराम पाचपांडे तसेच १०८ रुग्णवाहिका चालक जीवन शिरसाठ आणि बापू मराठे यांनी मोलाचे योगदान दिले. आरोग्य विभागाच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.




