भुसावळ (प्रतिनिधी) — येथील पु. ओं. नाहाटा कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, SHe Box तसेच भुसावळ तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंगविषयक कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, प्रमुख वक्त्या ॲड. प्रिया अडकमोल, पत्रकार तथा पॅरा लीगल व्हॉलंटिअर (PLV) उज्वला बागुल, त्यांचे सहकारी सौ. रूपाली नेवे व सौ. नेहा जावरे, युवती कल्याण समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील तसेच SHe Box व अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा. डॉ. स्वाती फालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार उज्वला बागुल यांनी विधी सेवा विषयक प्राथमिक माहिती देत जिल्हा व गावपातळीवर विविध कायदेविषयक शिबिरे आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. प्रमुख वक्त्या ॲड. प्रिया अडकमोल यांनी अँटी रॅगिंगविषयी मार्गदर्शन करताना “रॅगिंग सहन करणे हाही एक प्रकारचा गुन्हा आहे. रॅगिंग ही सीनियर होण्याची कोणतीही परंपरा नाही,” असे स्पष्ट केले. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांवर होणारे मानसिक व सामाजिक दुष्परिणाम, रॅगिंग करणाऱ्या तसेच ती सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांची विविध उदाहरणांद्वारे त्यांनी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, आपल्या वर्तनामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पूनम महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ममता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजनासाठी प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. निलीमा पाटील, प्रा. डॉ. संगीता भिरुड, प्रा. डॉ. पूनम महाजन, प्रा. अर्चना भालेराव, प्रा. प्रणिता राणे, प्रा. स्वाती शेळके, प्रा. स्मिता बेंडाळे, सौ. प्राजक्ता बागुल व श्रीमती शरयू भोळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


