भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यात बंदी असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर केलेल्या कारवाईत ८ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून, एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री करण्यात आली. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर नूतन परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. या पथकात पोलीस हवालदार संजय तायडे, संजय भोई, वाल्मीक सोनवणे, सलीम शेख, तसेच पोलीस कॉन्स्टेबल जगदीश भोई व लीना लोखंडे यांचा समावेश होता. बऱ्हाणपूरकडून जळगावकडे येणाऱ्या मार्गावर सोमवारी रात्री सुमारे ११.२० वाजेच्या सुमारास टोयोटा इनोव्हा कार (क्र. एमएच १९ एएक्स ३१२५) येताच पोलिसांनी तिला अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली. याप्रकरणी कारचालक किशन इंद्रलाल केसवानी (वय ३९, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सिंधी कॉलनी, पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हा प्रतिबंधित गुटखा बऱ्हाणपूर येथून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या गुटख्याच्या पुरवठा साखळीचा व इतर संबंधितांचा तपास पोलीस करीत आहेत.


