आमिष दाखवून साडेचार वर्षीय बालिकेला घरात नेऊन गैरवर्तन; जोगलखेडा येथे खळबळ : ६५ वर्षीय संशयिताविरुद्ध अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा; पोलिसांचा तपास सुरू :





भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील जोगलखेडा येथे साडेचार वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) समोर आली. या प्रकरणी संशयीत आरोपी धनराज दगडू जंजाळे (वय ६५, रा. जोगलखेडा) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित बालिका सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी धनराज जंजाळे हा तिच्याशी बोलत असल्याचे दिसून आले. काही वेळाने बालिका दिसत नसल्याचे लक्षात येताच तिच्या आईने परिसरात शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, संशयिताच्या एका नातेवाईकाने घटनास्थळी येऊन माहिती दिल्यानंतर त्याच्या सांगण्यावरून घराचा दरवाजा उघडण्यात आला. घरात अंधारात एका कोपऱ्यात पीडित बालिका आढळून आली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालिकेची सुटका करण्यात आली असून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

कुटुंबीयांनी बालिकेकडून माहिती घेतल्यानंतर संशयिताने तिला आमिष दाखवून घरात नेले व दरवाजा बंद केल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणी संशयित आरोपी धनराज दगडू जंजाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिविक्षाधीन डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जोगलखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.