भुसावळ (प्रतिनिधी) - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. दि. ५ गुरुवार रोजी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव येथील मुख्य अभियंत्यांकडे हतनूर धरणातील अतिरिक्त पाणी ओझरखेडा धरणात वळविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते.या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आज हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात अतिरिक्त पाणी यशस्वीरित्या सोडण्यात आले. यावेळी चिरंजीव हर्षराज पाटील यांच्या हस्ते ओझरखेडा धरणावर जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी हरताळा येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते , हरताळा-ओझरखेडा शिवारातील बांधव तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे हरताळा शिवार आणि ओझरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून आगामी रब्बी हंगामासाठीही हा दिलासादायक ठरणार आहे. दरवर्षी वाहून जाणाऱ्या लाखो लिटर अतिरिक्त पाण्याचा नियोजनबद्ध व परिणामकारक वापर करून ते शेतकऱ्यांच्या हितासाठी वळविण्यात आल्याने जलसंपत्तीचा अधिक प्रभावी उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्न करत राहणार असून, शेती आणि सिंचनाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा कायम राहील.


