भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला भव्य मुकुट सोहळा : भाविकांमध्ये उत्साह

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील ऐतिहासिक प्राचिन व धार्मिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या वेल्हाळे येथील हेमाडपंथी श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात यंदाही भव्य मुकुट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी, सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी मंदिरातून भगवान महादेवाचे मुकुट बाहेर काढण्यात येणार असून, या सोहळ्यामुळे वेल्हाळे गावात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर पूर्णपणे दगडात बांधलेले असून, मंदिराच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या आकर्षक व सुबक मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. मंदिराची स्थापत्यशैली आणि प्राचीन रचना भाविकांसह इतिहास व वास्तुकलेच्या अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेते.

या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकराची पिंडी श्रीयंत्रावर प्रस्थापित असल्याचे मानले जाते. अशा स्वरूपाची दुर्मिळ पिंडी देशातील मोजक्याच ठिकाणी आढळत असल्याने श्री कपिलेश्वर महादेव मंदिराला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

गतवर्षी मुकुट सोहळ्यानिमित्त वेल्हाळे येथे मोठ्या उत्साहात महासोहळा पार पडला होता. यंदाही सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी महादेवाचे मुकुट केवळ एक दिवस मंदिरात राहणार आहेत. त्यामुळे भाविकांनी याची विशेष नोंद घेऊन १७ ऑगस्ट रोजी सोहळ्याच्या दिवशी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आवश्यक तयारी सुरू असून, भाविक, शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम असलेल्या या भव्य मुकुट सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कपिलेश्वर महादेव मंदिर फाउंडेशन, वेल्हाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.