भुसावळ (प्रतिनिधी )(शहरातील प्रमुख रस्ते व फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमण विरोधात पोलिसांनी भुसावळ नगरपालिकेच्या मदतीने धडक कारवाई केली . या कारवाईत रस्त्याला अडथळा निर्माण करणारे अनधिकृत दुकाने व हातगाड्या हटवून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या. पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी व कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
भुसावळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, भुसावळ पोलिस प्रशासनाने १० ऑगस्ट रोजी विविध प्रमुख रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली. पालिकेच्या या विशेष पथकाने शहराच्या मध्यवर्ती भागासह प्रमुख बाजारपेठांमधील अनधिकृत बांधकामे आणि दुकाने तातडीने हटवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील प्रमुख मार्ग, वर्दळीची ठिकाणे आणि फुटपाथवर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, वस्तू तसेच हातगाड्या मांडल्या होत्या. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उपलब्ध उरली नव्हती. नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिस प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली भुसावळ नगरपालिकेच्या मदतीने नाहटा चौक आणि गांधी चौक परिसरातील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान पोलिस पथकाने अतिक्रमणधारकांना कडक इशारा दिला आहे. सार्वजनिक जागांवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास केवळ साहित्य जप्त केले जाणार नाही, तर संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
. पहिल्या टप्प्यात प्रमुख रस्ते मोकळे करण्यात आले असून, आगामी दिवसांत ही मोहीम शहराच्या अन्य भागांतही राबवली जाणार आहे.
भुसावळ हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि रेल्वे जंक्शन असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची व वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. यापूर्वीही पालिकेने अशा मोहिमा राबवल्या होत्या; परंतु कारवाई थंडावताच पूर्ववत स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
पोलिस व पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच व्यापारी पुन्हा रस्ते व्यापतात. त्यामुळे प्रशासनाने ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता नियमित पाहणी पथके तैनात ठेवावीत, अशी ठाम मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या विशेष पथक शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पाहणी करत असून, अनधिकृत साहित्याची जप्ती सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली जात असल्याने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. पोलिस प्रशासन आगामी काही दिवस शहरात नियमित गस्त घालून रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे समजते.