भुसावळात अंनिसचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; अंधश्रद्धेविरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भुसावळ शाखेतर्फे समितीचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील जेतवन बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित साथींचा परिचय करून घेण्यात आला. त्यानंतर अंनिसचे तालुका अध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले. ९ ऑगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पहिली बैठक होऊन समितीची स्थापना करण्यात आली. या घटनेला ३७ वर्षे पूर्ण झाली असून, अंनिसची भूमिका आणि वर्धापन दिनाचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले. तसेच सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अंनिस भुसावळ शहराध्यक्ष डॉ. सुभाष लोखंडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत अंनिसच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नवीन पुरुष सभासदांचा समितीत समावेश करून घेतला.

अंनिसचे बुवाबाजी प्रमुख अरुण दामोदरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवात कधी आणि कुठून झाली, याबाबत माहिती देत आपल्या कार्यातील अनुभव सविस्तरपणे मांडले.

अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष शांताराम जाधव यांनी विचार मांडताना दि. २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व पूर्वतयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

अंनिसच्या प्रधान कार्यवाह निरंजना तायडे यांनी यावेळी तीन नवीन महिला सदस्यांचा समितीत समावेश करून घेतला. विजय बाऱ्हे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ सोनवणे, विजय साळवे, डॉ. राजेंद्र बावस्कर, नरेश वाघ, वासनिक साहेब, पत्रकार राजेश तायडे, परदेशी पत्रकार, ज्योती कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी शीलाताई सारंग पवार, भूमिका पवार, छाया ताई, विलास तायडे, नितेश तायडे, एस. आर. तायडे, किसन आनंदा गवई, राजकुणाल ओव्हाळ, यशवंत मनोहर सहस्रबुद्धे यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंधश्रद्धेविरोधातील जनजागृतीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला.