भुसावळ (प्रतिनिधी)- आजची तरुण पिढी व्यसन, गुन्हेगारी तसेच सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आहारी जाण्याऐवजी देव, देश आणि धर्माच्या कार्यात सहभागी व्हावी, या उद्देशाने कंडारी (ता. भुसावळ) येथील तरुणांनी गौसेवा व गौरक्षेचा आदर्श उपक्रम सुरू केला आहे. कंडारी गावातील गोमाता व नंदीबाबांवर लक्ष ठेवत या तरुणांकडून नियमितपणे सेवा केली जाते. गाव परिसरात एखादा जखमी पशू आढळल्यास त्याला तातडीने मदत करून स्वखर्चाने उपचार केले जातात. जखमी पशूला श्री कपिलेश्वर महादेव मंदिर संचलित गोशाळेत आणून तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची सेवा व देखभाल केली जाते. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तरुणांना केवळ गोसेवेपुरते मर्यादित न ठेवता जखमी पशूंवर प्राथमिक उपचार कसे करावेत, गंभीर परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी आणि प्राण्यांना सुरक्षितपणे कसे हाताळावे, याचेही मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्राणीप्रेमाबरोबरच सामाजिक जबाबदारीची भावनाही निर्माण होत आहे. या कार्यासाठी गौरक्षक श्री वैभव वाघे, गौरक्षक श्री आदित्य धायडे (बल्लू भाऊ) व श्री अक्षय पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असून श्री हर्षल जामोदकर, श्री पवन कोळी, श्री देव ढंढोरे व श्री जीवन कोळी यांचे सहकार्य मिळत आहे. गावात लवकरच गोशाळा उभारण्याचा संकल्प कंडारी गावात गोवंशासाठी कायमस्वरूपी गोशाळा उभारण्याचे स्वप्न या टीमने पाहिले असून, हे स्वप्न लवकरच साकार करण्याचा निर्धार गौरक्षा-गौसेवा टीम, कंडारी विभाग, भुसावळ यांनी व्यक्त केला आहे. तरुणांनी व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि मोबाईल- सोशल मीडियाच्या अतिरेकापासून दूर राहून समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, देव, देश आणि धर्माच्या कार्याला प्राधान्य द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.


