वेल्हाळेच्या महिला शेतकरी गटाची शाश्वत शेतीकडे यशस्वी वाटचाल ; जीवामृत निर्मितीचे प्रशिक्षण; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला महिला शेतकऱ्यांशी संवाद :







भुसावळ (प्रतिनिधी)- 

शाश्वत शेती दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील श्रीगणेश महिला शेतकरी गटाच्या उपक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कुरबान तडवी यांनी विशेष प्रोत्साहन दिले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक उपक्रमांची माहिती घेतली.

कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत वेल्हाळे गावातील श्री. मयूर पाटील यांच्या शेतात सुरू असलेल्या हळद पिकाच्या शेतीशाळेत श्रीगणेश महिला शेतकरी गटातील रुपाली पाटील, कामिनी पाटील, ललिता पाटील, संगिता पाटील व शोभा महाजन यांनी शेतकऱ्यांना जीवामृत बनविण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. तसेच जीवामृताचा शेतीमध्ये योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून महिला शेतकरी शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत असून, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क व जीवामृत यांसारख्या जैविक निविष्ठांची निर्मिती करून त्यांचा शेतात वापर करीत आहेत. विशेष म्हणजे, गटातील महिलांनी स्वतःपुरते मर्यादित न राहता गावातील इतर शेतकऱ्यांनाही जैविक निविष्ठा तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य सुरू केले आहे.

महिलांच्या या सामूहिक प्रयत्नातून गटशेतीची चळवळ आणि शाश्वत शेतीचे उद्दिष्ट भुसावळ तालुक्यात प्रत्यक्षात यशस्वी होताना दिसत आहे. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या शेतीशाळेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी संगिता पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद जाधव तसेच शेतीशाळेतील लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी संवाद साधल्याबद्दल श्रीगणेश महिला शेतकरी गटाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.