भुसावळ ( प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त (१ ते ७ ऑगस्ट) विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ तसेच विविध आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विविध जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्तनपानास प्रोत्साहन देणे, माता व बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे आणि बाल पोषणाबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. हे अभियान मुख्य वैद्यकीय अधीक्षक (CMS) डॉ. शिवकुमार सी. एरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डीएमओ व कुटुंब कल्याण प्रभारी डॉ. रेश्मी जी. यांच्या समन्वयाने राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालयातील प्रसूती विभाग, सेंट्रल रेल्वे सेकंडरी ईएम स्कूल, भुसावळ, सेंट्रल इंजिनिअरिंग वर्कशॉप, मनमाड, नांदगाव आरोग्य केंद्र आणि नाशिक रोड आरोग्य केंद्र येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमांमध्ये डॉ. रेश्मी जी., स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गोरख व्ही. कमलाकर, CNS सुश्री करुणा, वरिष्ठ आहारतज्ज्ञ सुश्री शायजा जमाल, सुश्री ज्योती पाल तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांनी स्तनपानाचे महत्त्व, योग्य स्तनपान तंत्र, माता व बालकांचे पोषण आणि बालकाच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी योग्य स्तनपान तंत्राचे प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तर सत्र, पॉवरपॉइंट सादरीकरण, शैक्षणिक व्हिडिओ, पोस्टर-बॅनर प्रदर्शन आणि समूहचर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये एकूण ४२१ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने माता व बालकांचे आरोग्य, बाल पोषण आणि स्तनपानाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. स्तनपानाचे महत्त्व, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच योग्य व व्यावहारिक पद्धतींबाबत माता आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


