भुसावळ (प्रतिनिधी ) - गुजरातमधील अत्यंत श्रद्धेचा मानला जाणारा श्री दशामा देवी उत्सवाला शहरातील गुजराती समाजासह सर्व जातीय भाविकांमध्ये दशमा देवीच्या आगमनाची आतुरता दिसून येत आहे. श्री देवी दशमा उंटावर आरूढ असून कुमारिका आहे . देवीला गुलाबपुष्प प्रिय आहे . आषाढ महिन्यातील दीप अमावस्येच्या शुभमुहूर्तावर श्री दशामा देवीची विधीवत स्थापना करण्यात येते व पुढील दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती पूजन तसेच गरबा, दांडिया व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भक्तिमय वातावरणात केले जाते. यंदा १२ ऑगस्ट २०२६ बुधवार रोजी आषाढ दिप अमावस्या येत असल्याने या दिवशी श्री दशमा देवीची विधीवत स्थापना करण्यात येणार असून दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्री १२वाजे नंतर तापीनदी तीरावर विधीवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती येथील देविभक्त भूषण गजर यांनी दिली. उत्सवा दरम्यान दररोज देवीची कथा वाचन करून पूजा-अर्चा केली जाते तसेच विविध प्रकारच्या मिष्ठान्नांचा नैवेद्य अर्पण केला जात आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत गरबा, भजन, आरती तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालकांचा उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात . दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता दहाव्या दिवशी भंडारा महाप्रसाद करून करतात रात्री १२ वाजेला महाआरती नैवद्य करून नदी किनारी सूर्योदयापूर्वी पहाटे श्री दशामा देवीचे विधीवत विसर्जन करण्यात येते .विसर्जनावेळी भाविकांकडून कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली जाणार आहे. गुजरातमध्ये विशेष लोकप्रिय असलेला हा उत्सव महाराष्ट्रात सुद्धा सर्व समाजात मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असतो. दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने भाविक मनोभावे उपवास व्रत करून पूजन करतात. भुसावळ शहरात माजी नगरसेवक प्रकाश अहिरे यांनी गेल्या २० ते २२वर्षापूर्वी श्री दशमा स्थापना करून देवी उत्सव करण्यास प्रारंभ केला होता. नवसाला पावणारी देवी दशमा अशी आख्यायिका आहे. देवीच्या चमत्काराची प्रचिती अनेक भाविकांना आली त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांनी नवसपूर्ती म्हणून दशमा देवी व्रत करण्यास सुरूवात केली व आज जवळपास भुसावळ शहर परिसरात हजारो घरा घरामधून देवी दशमा स्थापना करण्यात येते. अवघ्या चार ते पाच दिवसांवर श्री देवी दशमा स्थापना होणार असल्याने मूर्ती तयार करणारे मूर्तिकार मूर्ती तयार करीत असून रंगरंगोटी व सजावट करीत आहे . तर भाविक जय्यत तयारीस लागले आहे . सामाजिक ऐक्य, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.


