भुसावळात शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य द्या; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : डीवायएसपी केदार बारबोले; गणेशोत्सवपूर्व मूर्तिकार व मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक; पर्यावरणपूरक उत्सव, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि वाहतूक शिस्तीवर भर

भुसावळ (प्रतिनिधी)- आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा, यासाठी शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार आणि व्यावसायिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य द्यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींची निर्मिती व स्थापना टाळावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) केदार बारबोले यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी डीवायएसपी कार्यालयात शहरातील गणेश मूर्तिकार व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे तसेच तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश सरदार उपस्थित होते.

बैठकीत पोलिस प्रशासनाने उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. उत्सवादरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जातील आणि सार्वजनिक शिस्त राखली जाईल, याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीतील प्रमुख सूचना- गणेशमूर्तींसाठी केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीचाच वापर करावा. पीओपीच्या मूर्तींची निर्मिती व स्थापना टाळावी.
शासन व स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या गणेशमूर्तींच्या उंचीच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे- डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम व न्यायालयीन आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा उपद्रवी प्रवृत्तीच्या व्यक्तींना गणेश मंडळांच्या कार्यकारिणीत स्थान दिले जाणार नाही. अशा व्यक्तींवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल- मंडळांतील अंतर्गत वाद किंवा गटबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पर्यावरणपूरक मंडळांचा होणार सन्मान

शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या तसेच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा पोलिस प्रशासनातर्फे विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिली.

नियमभंग सहन केला जाणार नाही

उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, ध्वनी प्रदूषण, मूर्तींची उंची, वाहतूक व्यवस्था तसेच सार्वजनिक शिस्त याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला.