भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात सखी सावित्री समितीअंतर्गत मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट २०२६) ‘आरोग्य व फिटनेसचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, योगाचे महत्त्व पटवून देणे तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील होत्या. फिटनेस कोच व आहारतज्ज्ञ सौ. मेधा सपकाळे यांच्यासह सौ. भावना पटेल, सौ. मीनाक्षी चाकर, सौ. कल्पना खंडारे आणि सौ. सुनीता पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सौ. मेधा सपकाळे यांनी प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थिनींना नियमित व्यायामाची गरज आणि ध्यानधारणेचे महत्त्व समजावून सांगितले. निरोगी शरीर व सुदृढ मनासाठी व्यायाम, योग आणि मेडिटेशनचा दैनंदिन जीवनात समावेश करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच सौ. भावना पटेल यांनी दैनंदिन आहार कसा असावा, संतुलित व सकस आहाराचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सखी सावित्री समितीच्या प्रमुख सौ. सुरेखा एन. भोळे यांनी केली. सूत्रसंचालन सौ. माधुरी पी. चौधरी यांनी केले, तर सौ. नम्रता आर. महाजन यांनी आभार मानले. अध्यक्षीय समारोपात श्रीमती स्वाती पाटील यांनी विद्यार्थिनींनी आरोग्याबाबत सजग राहून नियमित व्यायाम व संतुलित आहाराचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी सावित्री समितीच्या सदस्य सौ. स्वप्नाली जी. वाघुळदे, सौ. जयश्री डी. येवले तसेच सर्व शिक्षिकावृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.



