अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘लेखन प्रेरणा दिन’; उत्साहात निघाली ग्रंथ दिंडीवाचन संस्कृती रुजविण्यासह लेखना

                                     भुसावळ (प्रतिनिधी) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, लेखनाची प्रेरणा निर्माण करणे तसेच साहित्य, ज्ञान आणि संस्कारांविषयी जागरूकता वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करून झाली. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृती आणि प्रेरणादायी पुस्तके हातात घेऊन महाविद्यालय परिसरातून उत्साहपूर्ण दिंडी काढली. ज्ञानाचा प्रसार, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि साहित्याविषयी आदर व्यक्त करणारी घोषवाक्ये देत विद्यार्थ्यांनी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे म्हणाले, “ग्रंथ दिंडी म्हणजे केवळ पुस्तकांची मिरवणूक नसून ती ज्ञान, संस्कार, विचार आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने होणारी वाटचाल आहे.”

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी वाचनाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्त्व घडवून समाजाला नवी दिशा दिल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत असल्याची खंत व्यक्त करत प्राचार्य बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० मिनिटे नियमित वाचन करण्याचे आवाहन केले. पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर योग्य निर्णयक्षमता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, सुसंस्कार आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकदही देतात, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांकडून दररोज नियमित वाचन करणे, प्रत्येक महिन्यात किमान एक पुस्तक वाचणे, मित्र-मैत्रिणींमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे, महाविद्यालयीन ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे तसेच ज्ञानाचा प्रसार करून सुजाण, सुसंस्कृत आणि जबाबदार समाज घडविण्यास हातभार लावण्याचा संकल्प करून घेण्यात आला.

आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला— “वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल आणि ज्ञान मिळवाल तर जग जिंकाल.”

त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रंथालय विभाग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लेखन प्रेरणा दिन’ आणि ‘ग्रंथ दिंडी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व ज्ञानप्रबोधन करणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, साहित्याविषयी प्रेम आणि ज्ञानसंपन्न समाज घडविण्याची प्रेरणा निर्माण करण्यात या उपक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.