बाबासाहेबांच्या धुळे रेल्वे प्रवासाचा रेल्वेला विसर; स्मृती जतन करण्याची मागणी — जयसिंग वाघ

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे येथे ३१ जुलै १९३७ आणि १७ जून १९३८ रोजी चाळीसगाव–धुळे पॅसेंजर रेल्वेने प्रवास केला होता. याच रेल्वेगाडीने ते धुळ्यातून परत चाळीसगावला गेले होते. या दौऱ्यादरम्यान बाबासाहेबांनी एक दिवस धुळे शहरात मुक्कामही केला होता. देशातील अनेक रेल्वे स्थानकांनी बाबासाहेबांच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी जतन केल्या असल्या तरी धुळे रेल्वे स्थानकाला या ऐतिहासिक प्रवासाचा विसर पडल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केली.

धुळे येथील लांडोर बंगला आणि संदेशभूमी या ठिकाणांना भेट दिल्यानंतर जयसिंग वाघ यांनी सहकाऱ्यांसह धुळे रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्टेशन मॅनेजर शेख गुलाब अहमद यांची भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीची तसेच त्यांच्या रेल्वे प्रवासाची सविस्तर माहिती दिली.

धुळे रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात यावी तसेच त्यांच्या धुळे आगमनाच्या ऐतिहासिक तारखांचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाबासाहेबांच्या धुळे भेटीची आणि रेल्वे प्रवासाची ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी डॉ. उल्हास तासखेडकर, डॉ. प्रकाश वानखेडे, दिलीप तासखेडकर, चंद्रगुप्त सुरवाडे, सोमा भालेराव, डी. आर. वानखेडे, गौतम वाकोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जयसिंग वाघ यांनी लांडोर बंगला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्कामासंदर्भात अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लळिंग गावातही आले होते. लळिंग येथील पुनाजी अण्णा लळिंगकर यांच्या निमंत्रणावरून बाबासाहेबांनी या गावाला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जयसिंग वाघ यांनी गावकऱ्यांना दिली.