भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ‘वसुधरा’ सभागृहात सेवानिवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ गरिमामय निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भुसावळ विभागातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले तब्बल ३१ रेल्वे कर्मचारी भारतीय रेल्वेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा-निवृत्तीशी संबंधित सर्व देयकांचे तात्काळ वितरण सुनिश्चित करण्यात आले. याअंतर्गत सुमारे १७ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. या समारंभाला सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रम भावनिक, आत्मीय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ, समर्पित आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय रेल्वेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, सुखी, समृद्ध आणि सक्रिय आयुष्यासाठी शुभेच्छा देत, जीवनाच्या नव्या पर्वासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. समारंभादरम्यान उत्कृष्ट आणि सुरक्षित कार्यनिष्पादनाबद्दल पाच रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘अपघातमुक्त सेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) तसेच वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सौहार्दपूर्ण, भावनिक आणि गरिमामय वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवाकार्याला सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला.


