जळगाव - जळगाव शहरात भिशीच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक नागरिकांकडून पैसे जमा करून संबंधित महिला घराला कुलूप लावून बेपत्ता झाल्याचा आरोप असून या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरात आदर्श नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करून भिशी योजना सुरू केली होती. नियमित हप्ते भरल्यास ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम मिळेल, असे सांगून अनेकांकडून पैसे स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे...मात्र भिशीची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित महिलेने घर बंद करून परिसर सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ न शकल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 20 जणांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून एकूण फसवणुकीची रक्कम 20 लाख रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तपासादरम्यान आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तक्रारीच्या आधारे रामानंदनगर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, गुंतवणुकीचे तपशील आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.


