जळगाव - भारतीय संस्कृतीमध्ये सण साजरा करणे जसे महत्त्वपूर्ण मानले जाते तसेच त्यास अनुसरून पूर्वापार चालत असलेल्या कौटुंबिक महत्वास जोपासणे सुद्धा महत्त्वपूर्ण मानले गेले आहे . भारत एक कृषिप्रधान देश आहे व कृषिशी संबंधित बैल हा एक प्राणी आहे तेंव्हा या प्राण्याचा उत्सव म्हणून ' पोळा ' हा सण पूर्वापार साजरा करण्यात येतो . अनेक गावी पोळा सणात कुणाचा बैल पुढं असणार हे निश्चित केले गेले आहे . पोळ्याच्या सणात ज्याचा बैल पुढं ठेवण्यात येईल त्या कुटुंबाला गावात प्रतिष्ठा मिळायची . असेच एक हुलेसिंग मोतीराम जहागीरदार पाटील हे प्रतिष्ठित कुटुंब होते . पोळ्याच्या सणात पोळा फोडण्या करिता त्यांचा बैल पूर्वापार पुढं ठेवला जात असे मात्र १९३२ च्या सणात त्यांच्या ऐवजी मथूरादास वाणी यांचा बैल पुढं ठेवला गेला यावरून त्यांचेत संघर्ष झाला व हे प्रकरण शिरपूर न्यायालय गेले . इथं जहागीरदार यांच्याविरोधात निकाल लागला . त्यानंतर त्यांनी धुळे न्यायालयात धाव घेतली.
१९३७ मध्ये जहागीरदार पाटील यांनी त्यांची बाजू मांडण्या करिता ॲड. प्रेमसिंह तंवर व ॲड. सी . एम. मुळे यांना नेमले मात्र ॲड. तंवर व ॲड. मुळे यांनी ॲड. भीमराव रामजी आंबेडकर , मुंबई ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) यांना याकामी धुळे येथे निमंत्रित केले . ' हुलेसिंग मोतीराम जहागीरदार पाटील विरुध्द मथुरादास वाणी व अन्य १६ ' या कोर्टकेस चे कामकाज करण्याकरिता बाबासाहेब ३१ जुलै १९३७ रोजी धुळे शहरात आले . पुन्हा याच करण्याकरिता ते १८ जून १९३८ ला धुळे येथे आलेले आहेत . त्यांच्या युक्तिवादाने जहागीरदार यासंच्याबाजूने निकाल लागला व पोळा सणात जहागीरदार यांचा बैल पुढं ठेवण्याचा मान त्यांना मिळाला . या दोघं प्रसंगी ते चाळीसगाव - धुळे या रेल्वे गाडीने आलेले आहेत . दोघं प्रसंगी त्यांचे धुळे रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत झालेले आहे .
धुळे शहारा पासून बारा किलोमिटर अंतरावर आग्रा मुंबई महामार्गाला लागूनच प्रसिध्द ऐतिहासिक लळिंग किल्ला आहे . हा किल्ला सन १३७० मध्ये बांधण्यात आला आहे . ब्रिटिशांनी इथं अतिशय सुसज्य , आलिशान विश्राम गृह बांधले होते . हे विश्राम गृह ' लांडोर बंगलो ' ( पिकॉक हाऊस ) म्हणून ओळखले जाते . हा किल्ला निसर्गाने नटलेला असून सन १३७० पासून बांधण्यात आलेल्या तटबंदी मात्र आज पडाऊ झालेल्या आहेत . अनेक शिल्पे तुटलेली आहेत तर काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत आहेत . या किल्यावर हाजारो झाडे लावण्यात आली आहेत , या मुळे या किल्ल्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे . पावसाळ्यात हा किल्ला आपल्या सौंदर्याने अधिकच खुलून दिसतो , पर्यटकांचे मन या मुळे प्रसन्न होते . या किल्यावर आदिवासी जनतेने १९३० मध्ये ब्रिटिश सरकार विरुध्द मोठे आंदोलन केलेले आहे.
सन १९९० मध्ये धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात लेखापाल म्हणून नोकरीस असलेले पी . आर . आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटी विषयी माहिती मिळविली असता बाबासाहेब ३१ जुलै १९३७ ला धुळे येथे आले असल्याचे त्यांच्या वाचनात आले . तेंव्हा बाबासाहेब धुळे येथे आले असता कोठे थांबले असतील ? असा त्यांना प्रश्न पडला , या प्रश्नाचा मागोवा घेतला असता ब्रिटिश कालीन शासकीय विश्रामगृह लळिंग किल्ल्यावर असल्याचे त्यांना दिसून आले व येथे बाबासाहेब थांबले असावेत असा कयास धनंजय कीर यांच्या पुस्तकातील ' बाबासाहेब लळिंग गावी गेले ' या वाक्याचा आधार घेवून केला . त्यांनी ही माहिती अन्य अधिकाऱ्यांना कळविली , सुरेश थोरात , किशोर गजभिये व अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने लळिंग किल्ल्यावरील विश्रामगृहाची डागडुजी , सुशोभीकरण करवून घेतले . या घटनेची धुळे शहरात जोरदार चर्चा झाली . काही जाणकार मंडळी , अभ्यासक तसेच आजूबाजूची जनता या किल्ल्यावर येवून विश्रामगृहाचे दर्शन घेवू लागली .
सन १९९० पासून प्राचार्य डॉ. जे. जी. खैरनार , एम. जी. धिवरे , शशिकांत वाघ , वाल्मीक दामोदर व अन्य काही मंडळी ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यावर आले होते '. असे मित्रमंडळी , सामाजिक कार्यकर्ते यांना सांगू लागले . त्यामुळे मोठ्याप्रमाणात लोक इथ ३१ जुलै रोजी येवून लांडोर बंगल्यास भेट देऊ लागली . पुढं पुढं लोकांचे येण्याचे प्रमाण वाढत गेले . मग ही बाब महाराष्ट्रात पोहचत गेली आणि मागील २० - २२ वर्षां पासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येवू लागली . आमदार , खासदार , मंत्री हजेरी लावू लागली , आंबेडकरी समूहातील / चळवळीतील काही दिग्गज लोक ३१ जुलै रोजी याठिकाणी भेट देऊ लागले , त्या मुळे लोकांचे प्रमाण सातत्याने वाढतच गेले . या घटनेची माहिती मध्य प्रदेश , गुजरात या लगतच्या राज्यांमध्ये पोहचली व या राज्यांमधून सुद्धा काही मंडळी येथे ३१ जुलैला भेट देण्याकरिता येऊ लागले.
लळिंग किल्ल्यावर येवढ्या मोठ्याप्रमाणात लोक येतात म्हणून हळू हळू तिथं विविध प्रकारचे स्टॉल्स लागू लागले , पुस्तकांची दुकानं लागू लागली , लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री लागली . मनोरंजन करण्याकरिता विविध कलाकार आपली कला सादर करू लागले , नाष्टा , भोजन मोफत देऊ लागले . पोलिस विभाग मोठयाप्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेऊ लागले , वृध्द , अपंग लोकांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस विभागातर्फे गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे . दिवसेंदिवस या ' भिमस्मृती यात्रा ' महोत्सवाचे महत्व वाढत असून दरवर्षी ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील या लांडोर बंगल्यास भेट देऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून धन्यता मानणाऱ्या भिमण्यायांची संख्या अधिकाधिक वाढवत आहे .
निसर्गाने नटलेला हा किल्ला ३१ जुलै या दिवशी हजारो लोकांच्या उपस्थितीने , विविध प्रकारच्या प्रदर्शनांनी , हजारो गाड्यांनी एकदम बहरून जातो , त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते . निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात बाबासाहेबांच्या आठवणींनी ही ' भीम स्मृती यात्रा ' एक वेगळाच आनंद देवून जाते .
लेखक- जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव
संपर्क - ९८८१९२८८८१