हतनूर प्रमुख प्रकल्पाची सद्यस्थिती हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, धरणाचे ३१ जुलै रोजी १२ वाजे दरम्यान सर्व ४१ रेडियल दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात तब्बल ८,९२६ घनमीटर प्रतिसेकंद (३,१५,२२२ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत धरणाची सध्याची पाणीपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून धरणाची पूर्ण संचय पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) असून उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका आहे. धरणातून कालव्याद्वारे ५.६६ घनमीटर प्रतिसेकंद (२०० क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. आज धरण परिसरात ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंतचा एकूण पाऊस २५८ मिलिमीटर इतका झाला आहे. तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


