भुसावळ (प्रतिनिधी )-
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या नवीन सेमेस्टरमध्ये, श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळमध्ये आर्टीफिशियल इंटिलीजन्स अँड डेटा सायन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विज्ञान) व रोबोटिक्स अभियांत्रिकी शाखेत बी-टेक कोर्सला एआयसीटीईने मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाच्या मान्यतेनंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) भारत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. एआयसीटीईने महाविद्यालयात उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे या नवीन बी टेक कोर्सेससाठी मान्यता दिली आहे.
आजच्या काळामध्ये आणि भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञान अभियंत्यांची व तज्ञांची सर्वाधिक मागणी आहे. या क्षेत्रात चांगल्या रोजगाराची मोठी शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान सॉफ्टवेअर आणि आयटी, बँकिंग, फायनान्स मार्केटींग, शिक्षण, आरोग्य सेवा, उत्पादन आणि इतर उद्योग, प्लेसमेंटच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत.
श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची रोबोटिक्स प्रकारात विश्व विख्यात कामगिरी असून देशविदेशात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आर्टीफिशियल इंटिलीजन्स अँड डेटा सायन्सच्या ६० जागा व रोबोटिक्स अभ्यासक्रमाला ३० जागांची मान्यता मिळाली आहे. या दोन्ही कोर्सेस मुळे आता विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण भुसावळात उपलब्ध होणार आहे असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले आहे.



