भुसावळात पोलिसांचे धडाकेबाज संयुक्त ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती, १०० संशयितांची चौकशी, २५ ते ३० जण ताब्यात

भुसावळ(प्रतिनिधी दि. २९ जुलै )- भुसावळ शहरासह संपूर्ण उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार चोरीसह विविध गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने भुसावळ पोलीस उपविभाग व रेल्वे सुरक्षा बल (RPF) भुसावळ अँक्शन मोडमध्ये  असून गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे पार्श्वभूमीवर दोघांनी संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २९ जुलै रोजी पहाटे धडक 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविण्यात आले. या व्यापक मोहिमेदरम्यान पोलीस व आरपीएफ च्या संयुक्त पथकांनी ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेतली, सुमारे १०० संशयितांची कसून चौकशी केली तसेच २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी अवैध शस्त्रे, चोरीची केबल व गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले.

या विशेष मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार तसेच आरपीएफ च्या मोठ्या फौजेने सहभाग घेत विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाया केल्या.

प्रमुख कारवाया

NBW वॉरंटातील आरोपी जेरबंद :
रेल्वे पोलीस ठाण्यातील ३ नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर यास यशस्वीरित्या ताब्यात घेण्यात आले.

अवैध कोयत्यासह आरोपी अटकेत :
पंचशील नगर परिसरातून शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध Arms Act कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

प्रतिबंधात्मक कारवाई :
चोरीचे भंगार खरेदी करणारा शेख सरदार शेख बशीर याच्यावर BNSS कलम १२८ + २ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

चोरीची केबल व कटर जप्त :
दीपनगर परिसरात राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून चोरी केलेली सुमारे ५० किलो वजनाची केबल व कटर जप्त करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली.

मोठ्या प्रमाणावर झाडाझडती

या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ६० सराईत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच १०० संशयित गुन्हेगारांची शॉर्टलिस्ट तयार करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मोहिमेदरम्यान २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून रेकॉर्डवरील सर्व सराईत गुन्हेगारांची सखोल पडताळणी करण्यात आली.

तगडा पोलीस बंदोबस्त

ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईमध्ये २ प्रोबेशनरी उपविभागीय पोलिस अधिकारी, ५ पोलीस अधिकारी , ३५ पोलीस अंमलदार, तसेच आरपीएफ चे ३ पोलीस निरीक्षक व २३ कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय जळगाव येथील ३ RCP प्लाटून देखील मोहिमेत सहभागी झाले.

सहभागी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, भुसावळ शहारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी राहुल तायडे यांचा समावेश होता. पथकांची रचना १+१४, २+१० आणि १+११ अशा नियोजनबद्ध स्वरूपात करण्यात आली होती.

'झिरो टॉलरन्स' धोरण कायम

भुसावळ पोलीस उपविभागाने स्पष्ट केले की, उपविभागातील गुन्हेगारीवर 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण राबविण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धडक कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही सातत्याने सुरू राहतील. कायदा मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.