भुसावळात शासकीय कागदपत्रात ‘चमार’ शब्दाची कथित बनावट भर; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल : जात प्रमाणपत्र प्रकरणाशी संबंधित रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचा आरोप; २८ जुलैच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष :

भुसावळ ( प्रतिनिधी ) -  जात प्रमाणपत्राअभावी अपात्र ठरलेल्या भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या आजोबांच्या नावापुढे ‘चमार’ हा शब्द वेगळ्या हस्ताक्षरात व वेगळ्या शाईने लिहून शासकीय कागदपत्रात बनावट भर घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुप खोब्रागडे आणि कंत्राटी कामगार देवेंद्र जोशी यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अॅसेसमेंट रेकॉर्डमध्ये संशयास्पद नोंद

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर दशरथ बाविस्कर (५८, रा. साईहिल्स कॉलनी, खेडी रोड, भुसावळ) हे १३ जानेवारी १९९९ पासून भुसावळ नगरपरिषदेत अभिलेख विभागात कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे असेसमेंट उतारे, बांधकाम परवानगीच्या नोंदी, जन्म-मृत्यू दाखले तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची जबाबदारी आहे.

नगरपरिषदेतील सन १९७५ पासूनचे असेसमेंट रेकॉर्ड वर्षनिहाय गठ्ठ्यांमध्ये बांधून माळ्यावर ठेवण्यात आले आहेत. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता अनुप खोब्रागडे व देवेंद्र जोशी हे माळ्यावरून असेसमेंटचे गठ्ठे काढून रेकॉर्ड शोधत असल्याचे बाविस्कर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर पुढील दोन दिवसही संबंधितांकडून रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

‘चमार’ शब्द वेगळ्या हस्ताक्षरात लिहिल्याचा आरोप

२ मार्च २०२६ रोजी गिरीष अशोक पारधी यांनी सन १९५० पासूनच्या अॅसेसमेंट बुकाची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर संबंधित रेकॉर्डमधील गठ्ठे तपासताना बाविस्कर यांच्या निदर्शनास संशयास्पद बाब आली.

सन १९७५-७६ तसेच १९८० ते १९८४ या कालावधीतील नोंदींमध्ये भाग क्रमांक ३/२७४, मिळकत क्रमांक १५४४, घरमालक गणेश प्रसाद पुदन यांच्या मालमत्तेतील भाडेकरू नोंद क्रमांक ८ वर ‘प्रेमनाथ कांता प्रसाद’ या नावाखाली ‘चमार’ हा शब्द अतिरिक्त स्वरूपात वेगळ्या हस्ताक्षरात व वेगळ्या शाईने लिहिलेला आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर बाविस्कर यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित रेकॉर्ड पूर्वस्थितीत ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर १ एप्रिल २०२६ रोजी कार्यालयीन आदेशानुसार मूळ कागदपत्रे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे पडताळणीसाठी नेऊन त्यांची प्रत सादर करण्यात आली.

शासकीय कागदपत्रात जाणूनबुजून फेरफार केल्याचा आरोप

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत अनुप खोब्रागडे व देवेंद्र जोशी यांनी संगनमताने संबंधित रेकॉर्डमध्ये जाणूनबुजून फेरफार करून ‘चमार’ हा शब्द अतिरिक्त स्वरूपात लिहिल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीचे नुकसान होऊ शकते, याची जाणीव असूनही शासकीय कागदपत्रात बनावट लेखन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इकबाल सैय्यद तपास करीत आहेत.

भुसावळातील राजकीय वातावरण तापले; २८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष

जात प्रमाणपत्राअभावी गायत्री भंगाळे-गौर अपात्र ठरल्यानंतर या प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. संबंधित प्रकरणात खंडपीठात याचिका दाखल असून, अलीकडे झालेल्या सुनावणीनंतर संबंधितांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता २८ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत खंडपीठ काय आदेश देते, याकडे भुसावळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा विषय असून, पोलिस तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.